धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील 140 कोटी रूपयांच्या रस्त्यांच्या कामावरून शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यात मतभेद निर्माण झाले असून, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करीत सोमवार दि. 03 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या भेट घेवून सखोल चौकशी मागणी करणार आहे असे सांगितले. तर शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढवून तिसरा पर्याय जनतेसमोर ठेवणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. 

शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेस शिवसेना शहरप्रमुख आकाश कोकाटे, डी. एन. कोळी उपस्थित होते. धाराशिव शहरातील रस्त्याच्या कामाबाबत माहिती देताना सुरज साळुंके यांनी 2024 ला आमच्या मागणीनुसार शहरातील रस्त्यांच्या कामांची 140 कोटी रूपयांची निविदा काढण्यात आली. शहरातील भुयारी गटारामुळे शहरातील रस्ते अत्यंत खराब झाले होते. त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत यांनी विशेष प्रयत्न करून रस्त्याच्या कामासाठी 140 कोटींचा निधी आणला होता. परंतु सध्या भाजपचे काही नेते यांचे श्रेय घेत असून, 140 कोटींच्या कामाबाबत लाडक्या गुत्तेदारासाठी प्रयत्न करीत आहेत. असा आरोप करून सुरज साळुंके यांनी नगर विकास विभागाच्या सचिवाने या गुत्तेदाराच्या विरोधात निर्णय दिला होता. परंतु काही दिवसानंतर या सचिवाने सदर गुत्तेदारास काम चालू करण्यास न. प. च्या मुख्याधिकारी मार्फत सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे शिवसेना शिष्टमंडळ सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या भेट असल्याचे सांगितले. 

तर जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी भुयारी गटारीचे काम करणारे गुत्तेदार ब्लॅक लिस्टमध्ये होता. या प्रकरणात भाजप कोर्टातही गेले होते. परंतु त्याठिकाणी त्यांचा व शिवसेना उबाठा गटाचा समझोता झाला असल्याचा आरोप सुधीर पाटील यांनी करून आगामी निवडणुका शिवसेना शिंदे गट स्वतंत्रपणे लढविल असे सांगितले. 


संपर्क झाला नाही

या संदर्भात धाराशिव नगर परिषदेचे मुख्याधिकारी निता अंधारे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी व्हाईस मेलमध्ये आपला मेसेज देण्यास सांगितले. या संदर्भात न.प. कार्यालयात अधिक माहिती घेतली असता न. प. निवडणूक मतदार यादीच्या कामात मुख्याधिकारी व्यस्त असल्याचे सांगिण्यात आले. त्यामुळे सुरज साळुंके यांनी केलेल्या आरोपावर मुख्याधिकारी अंधारे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.  

 
Top