वाशी (प्रतिनिधी)-  “सर, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका या शाळेतच राहा, आम्हाला शिकवा” असा आर्त आक्रोश करत दसमेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सहशिक्षक प्रशांत भानुदास जाधवर यांना निरोप दिला. शाळेतून बाहेर पडणाऱ्या सरांना मिठी मारत मुले हंबरडा फोडत रडू लागली. तर गावकरी आणि शिक्षकांच्या डोळ्यातही अश्रू तरळले.

गेल्या सात वर्षांपासून जाधवर सर दसमेगाव शाळेत कार्यरत होते. शाळेचे रूपडे बदलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शाळेसाठी वॉलकंपाउंड मंजूर करून घेणे, बोअरवेल व मोटर बसवून कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सोय करणे, शेकडो फळझाडे व शोभेची झाडे लावणे, उन्हाळ्यात स्वतः शाळेत येऊन झाडांना पाणी घालणे, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे, मुक्कामी राहून अतिरिक्त तास घेणे, तसेच गावात महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करणे अशा अनेक कार्यातून त्यांनी शाळा व गावकऱ्यांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली. गुरुजी शाळा म्हणजे घर आणि विद्यार्थी म्हणजे आपला परिवार असे मानून कार्यरत होते. त्यामुळे पूर्ण गाव व विद्यार्थ्यांसह काही शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. यावेळी मुख्याध्यापक हरिभाऊ रणदिवे यांनीही जाधवर गुरूजी यांना मिठी मारून डोळ्यांतले अश्रू पुसले. 

 
Top