वाशी (प्रतिनिधी)- माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशी शहरातील व्यापारी बांधवांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दुकाने व साठवलेला माल पावसाच्या पाण्याने भिजल्याने अनेक व्यापारी हवालदिल झाले आहेत. नुकसानीबाबत प्रशासनाने पंचनामे केले असूनही व्यापाऱ्यांना आजतागायत कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.
दरम्यान, नुकसानीतून सावरण्याआधीच दि. 19 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचा मौल्यवान माल नष्ट झाला आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी आणलेला मालही पाण्यामुळे खराब झाल्याने व्यापारी मोठ्या अडचणीत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर व्यापारी बांधवांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करून तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शहरातील पाण्याच्या निचऱ्याबाबत योग्य उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेस द्यावेत, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदनावर सूर्यकांत मोळवणे, प्रवीण पवार,मुकुंद शिंगणापुरे खालेक भाई पटवेकर,बाळासाहेब शेरकर,किरण कवडे,बाळासाहेब उंद्रे सचिन पवार महादेव विश्वेकर, विशाल महामुनी यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.