भूम (प्रतिनिधी)-  आमदार जयंत पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकरी बांधवांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतील असे त्यांनी आश्वासन दिले.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेलं भीषण वास्तव पाहून मन हेलावून गेलं. गावोगावी उभं पीक पूर्णपणे पाण्याखाली जाऊन नष्ट झालं आहे. अनेक शेतकऱ्यांचा संपूर्ण खर्च वाया गेला आहे. केवळ पीकच नाही, तर उपजाऊ माती, सिंचन साधनं, सोलर पंप वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांचे आधार असलेली जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. घरं, दुकाने कोसळली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

याहूनही वेदनादायक बाब म्हणजे अजूनही पंचनाम्याचे काम सुरू झालेले नाही. ढासळलेल्या मनःस्थितीत शेतकरी शासनाकडे मदतीसाठी पाहत आहेत. सरकारने त्यांच्या आर्त हाकेला प्रतिसाद देऊन तातडीने मदत जाहीर करावी ही आग्रही मागणी केली. या पाहणीवेळी प्रदेश सरचिटनीस डॉ. प्रतापसिंह पाटील, किरण कार्ले, सुहास ठोंगे, प्रवीण गरड, प्रताप पाटील, बालाजी गटकल, महेश परेकर, ॲड. देवकते आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top