धाराशिव (प्रतिनिधी)- पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे शेकडो गावे उद्ध्वस्त झाली असून, हजारो कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आहेत. घरदार, शेती, जनावरे वाहून गेल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गंभीर परिस्थितीत धाराशिव येथील फालह दराईन अरबी मदरसा संचलित संदोखचा फाउंडेशनने मानवी सेवेचे उत्तम उदाहरण घालत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

फाउंडेशनचे मौलवी मंडळी, सदस्य व कार्यकर्त्यांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देऊन मदतीचा हात दिला. पठाणकोट बॉर्डर परिसरात फाउंडेशनतर्फे अन्नधान्य, कपडे, औषधे व अन्य अत्यावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. दरम्यान, पंजाबमधील गुरुद्वारामध्ये संदोखचा फाउंडेशनच्या वतीने लंगरचे आयोजन करण्यात आले. यात शेकडो नागरिकांनी भोजनाचा लाभ घेतला. आपत्तीग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम नागरिकांना दिलासा देणारा ठरला. “मानवी सेवाच खरी ईश्वर सेवा” या भावनेतून हे मदतकार्य सुरू असल्याचे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या मदत कार्यात *पंजाबचे शाही इमाम मौलाना मुहम्मद उस्मान रहमानी लुधियानवी व त्यांचे सहकारी सक्रियपणे सहभागी झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी पंजाबातील विविध भागांत जाऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.धाराशिवचे फाउंडेशन सदस्य निझाम हाफिस साहब, खारी मकसूद अली, हाफिस इम्तियाज खान व हाफिझ बशीर यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, अनेक कुटुंबांचे घर पूर्णपणे कोसळले असून काहींचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी या आपत्तीग्रस्तांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शाही इमाम मौलाना रहमानी लुधियानवी यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केले  “पूरग्रस्तांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी आपण सर्वांनी मानुसुकीचे उदाहरण घालू या. आपत्तीच्या या काळात मानवतेच्या बळावर आपण एकत्र आलो, तर त्यांना पुन्हा उभे करू शकतो.” संदोखचा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे पंजाबसह धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक सलोखा, धार्मिक एकोपा आणि मानवीतेचे दर्शन घडवणारे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 
Top