मुंबई (प्रतिनिधी)- सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे.  मात्र शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पीक पद्धतीचा वापर करावा. शेतीचे आरोग्य संवर्धन उपाय होणे ही काळाची गरज आहे.. या  सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दूरदृश्य प्रणाली द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील 2,458 मेगावॅट क्षमतेच्या 454 सौर ऊर्जा प्रकल्पाचे  लोकार्पण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

राजस्थान बांसवाडा येथे  ऊर्जा तसेच विविध विकास योजनांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे ऑनलाईन  प्रक्षेपण  बांद्रा पूर्व प्रकाशगड येथून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, राज्यातील पी एम  कुसुम सी - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 आणि पी एम  कुसुम सी बी - मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी शेतकरी उपस्थित  होते. या कार्यक्रमात  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यांशी  संवाद  साधला. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, सौर ऊर्जा प्रकल्पाचे खूप फायदे आहेत. शेतकऱ्यांना शेतीला दिवसा वीज उपलब्ध होते आहे त्याच बरोबर बारमाही पाण्याची व्यवस्था झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. आता शेतकऱ्यांनी केमिकलमुक्त शेती करण्यावर भर दिला पाहिजे.  झिरो कॉस्ट फार्मिंगला देखील महत्त्व दिले पाहिजे. झिरो बजेट नैसर्गिक शेती ही अशी शेती पद्धत आहे, ज्यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर कमी करून खर्च कमी केला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांची शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक वाचते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर पारंपारिक शेतीऐवजी काळानुरूप बदलती शेती करणे गरजेचे आहे.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताला आज एक लाख करोड खाद्यतेलाची आयात करावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी खाद्यतेल बियांची लागवड करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मिलेटचीदेखील सध्या खूप मागणी आहे हे लक्षात घेता त्या प्रकारच्या पद्धतीची पिके घेतली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांची आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल होईल. राज्याचे राज्यपाल आर्चाय देवव्रत यांचे नैसर्गिक शेतीवरील व्याख्यान शेतकऱ्यांनी जरूर ऐकावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थी शेतकऱ्यांचा परिचय करून दिला. 



राज्याचा देशात प्रथम क्रमांक

पीएम कुसुम सी-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेत सहा लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. यामुळे 32.08 लाख एकर जमीन ओलिताखाली आली  आहे. तसेच इतर विविध योजनेतून राज्यात आतापर्यंत 6 लाख 46 694 सौर कृषी पंप बसविण्यात आले असून राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या योजनेमुळे 20.95 लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे.


 
Top