धाराशिव (प्रतिनिधी)-  पत्नीच्या हत्याप्रकरणी आरोपी पतीस सबळ पुरावा व अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी केलेल्या युक्तीवाद ग्राह्य धरून कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपी विठ्ठल संगापुरे यास जन्मठेप व 5 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सोमवार दि. 15 सप्टेंबर रोजी ठोठावली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील रांजणी येथील आरोपीचे शेत गट क्रमांक 140 मध्ये त्यांच्या राहत्या पत्राच्या शेडमध्ये 1 मार्च 2022 रोजी ही हत्याची घटना घडली आहे. यातील आरोपी नामे विठ्ठल आप्पा संगापुरे (वय 57 वर्षे, रा. रांजणी, तालुका कळंब) हा व त्यांची पत्नी त्यांच्या रांजणी शिवारातील पत्राच्या शेडमध्ये राहण्यास होते. मागील 15 दिवसापासून तो त्यांची पत्नी नामे मंगल विठ्ठल संगापुरे हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिला शेडच्या बाहेर जावू देत नव्हता. तसेच तिला कोणाशी बोलू देत नव्हता. तसेच तो तिला तुला जिवे ठार मारतो अशी धमक्या देत असल्याने आरोपीचा मोठा मुलगा नामे बाळासाहेब विठ्ठल संगापुरे हा तेथे झोपण्याकरिता जात होता. परंतु दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजीच्या रात्री तेथे झोपण्यासाठी गेला नसल्याने यातील आरोपी विठ्ठल आप्पा संगापुरे याने पत्नी मंगल विठ्ठल संगापुरे हिच्यावर असलेल्या चारित्र्यावरील संशयावरून रागाच्या भरामध्ये कोयत्याने पत्नी मंगल झोपेत असताना तिच्या हातावर, गळ्यावर मारून तीस गंभीर जखमी केले व तिला जीवे ठार मारले. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 58/22 शिराढोण पोलिस स्टशेनमध्ये फिर्यादी परमेश्वर विठ्ठल संगापुरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी एपीआय नेटके व उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. 

सदरील प्रकरणामध्ये सरकारपक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी परमेश्वर विठ्ठल संगापुरे व बाळासाहेब विठ्ठल संगापुरे हे फितुर झाले होते. सदरील प्रकरणामध्ये शकेला दगडू शेख व हाजू इस्माईल शेख यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तसेच वैद्यकीय अहवाल, परिस्थितीजण पुरावे व अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपी विठ्ठल संगापुरे यास जन्मठेप व 5 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.


 
Top