भूम (प्रतिनिधी)-  शहरातील वीर गल्ली भागात गुरुवारी सकाळी घडलेल्या विद्युत अपघातामुळे मोठे नुकसान झाले आहे. 11 केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहिनीवरील इन्सुलेटर अचानक फुटल्याने शॉर्टसर्किट झाला. या घटनेत पाच घरांमधील विद्युत मीटर व घरगुती लाईट फिटिंग्स पूर्णपणे जळून खाक होऊन यात संबंधित घरांमध्ये 55 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती सदरील घरातील नागरिकांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील वीर गल्ली येथे सकाळी  सहा च्या दरम्यान अचानक विजय वीर यांच्या घरात जोराचा आवाज झाला. यात लाईट फिटिंग पूर्ण पणे जळून खाक झाली. यामुळे घरात धुराचे लोट झाल्याने परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर धावले. काही वेळ परिसरात धूर आणि ठिणग्यांचा पाऊस पडल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. विजेच्या जोरदार झटक्यामुळे घरातील टीव्ही, फ्रिज, पंखे आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणेही निकामी झाली आहेत. त्याचे पंचनामे विद्युत विभागाने केले आहेत. 

यामुळे नागरिकांनी  तात्काळ शहर अभियंता व सदरील भागातील लाईनमन यांना फोनवर माहिती दिली. महावितरणचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ वीजपुरवठा खंडित करून परिस्थिती नियंत्रणात आणली.


पंचनामा झाला नुकसान भरपाई मिळेल का

सदरील घटनेत नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याचा महावितरणने त्वरीत पंचनामा देखील केला आहे. परंतु याची नुकसान भरपाई कधी मिळणार याबाबत मात्र काहीच सांगितले नाही. अशी चर्चा नागरिकात होती. झालेल्या घटनेत ज्या नागरिकांची नुकसान झाली आहे. याची पाहणी केली असून पंचनामा देखील केला आहे. याचा अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तातडीने देण्यात येईल. मदत मिळताच सदरील नुकसान ग्रस्त नागरिकांना देण्यात येईल. 

प्रवीण धुमाळ 

शहर अभियंता महावितरण भूम.

 
Top