धाराशिव (प्रतिनिधी)- रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत नियमितपणे कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे.या तपासणीत अनियमितता आढळल्याने जिल्ह्यातील 7 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.त्यापैकी 4 सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 3 केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान ई-पॉस मशीनप्रमाणे साठा न जुळणे, परवान्यात नमूद नसलेल्या स्रोतांकडून खरेदी-विक्री करणे,साठा रजिस्टरमध्ये नोंद नसणे,शेतकऱ्यांना विहित नमुन्यात पावती न देणे,खरेदी बिले नसणे,परवान्यात गोदामाचा समावेश नसणे इत्यादी अनियमितता आढळून आल्या. कारवाई झालेल्या केंद्रांमध्ये धाराशिव तालुक्यातील 2,लोहारा 1,भूम 1, परंडा 1 व वाशी तालुक्यातील 3 सेवा केंद्रांचा समावेश आहे.यापूर्वी खरीप हंगामात जिल्ह्यातील 43 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती.कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की,तपासणी पुढेही सुरू राहणार असून दोषी विक्रेत्यांवर बियाणे,खते व कीटकनाशके कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत परवानाधारक सेवा केंद्रातूनच खरेदी करावी.खरेदीवेळी पक्की पावती घेऊन त्यावरील तपशील,विक्रेत्याची स्वाक्षरी तपासावी.अनुदानित खत खरेदी करताना ई-पॉस मशीनवरून मिळणारे बिल घ्यावे.खताच्या पिशवीवरील किंमत व बिलातील दर तपासावा. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व टॅग, पिशवी,थोडे बियाणे हंगामभर जतन करावे.नामांकित कंपनीचेच बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करावीत. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम.के.आसलकर यांनी शेतकऱ्यांना योग्य जागरूकता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

 
Top