धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती धाराशिव च्या वतीने 'लेखक आपल्या भेटीला' हा उपक्रम घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील प्रख्यात साहित्यिक डॉ राजेंद्र मलोसे यांनी त्यांच्या साहित्यिक वाटचालीविषयी अनुभव कथन करताना सुरुवातीच्या काळातच व्ही व्ही चिपळूणकर यांच्यासारख्या थोर विचारवंत व साहित्यिकाचा परिसस्पर्श झाला आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे डॉक्टर झाल्यावर शहरी भागात काम न करता नाशिक जिल्ह्यातील चांदवड सारख्या दुर्गम भागात सपत्नीक सेवा दिली आणि त्या अनुभवातून स्वप्नपंख, गाथा सप्तपदी अशा प्रचंड खप झालेल्या सहा कादंब-यांचा जन्म झाला असे सांगत हा प्रवास किती कष्टप्रद होता तरीही आनंदाने केला असे सांगितले. त्याचबरोबर लेखकाने पुस्तक काढण्याची घाई न करता आपण लिहिलेल्या साहित्यावर योग्य प्रकारे परिष्करण करावे व मग साहित्यकृती जन्माला घालावी असाही सल्ला दिला. 

     धाराशिव येथील साहित्यिक मंडळींनी देखील डॉ राजेंद्र मलोसे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी डॉ मलोसे यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल साहित्य भारती धाराशिव च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे, डॉ अभय शहापूरकर, जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे, प्राचार्य डॉ प्रशांत एल, सिनेट सदस्य देविदास पाठक, मीना महामुनी, ॲड जयश्री तेरकर, समाधान शिकेतोड, अक्षय मुंडे, ॲड नामदेव तेरकर, योगेश अत्रे, ॲड वैभव अत्रे, राजाभाऊ कारंडे इत्यादी उपस्थित होते.

 
Top