धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील आरोग्य सेवांना शाश्वत ऊर्जेचा आधार देत नवा टप्पा गाठण्यात आला आहे.पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोलार पॉवर पॅक व सोलार वॉटर यंत्रणांचे लोकार्पण तसेच असंसर्गजन्य रोग (NCD) क्लिनिकचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.
ओएनजीसी (ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन) कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी (CSR) अंतर्गत ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौर ऊर्जा व शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.यामुळे एकूण ३७ आरोग्य केंद्रांना सौर ऊर्जा व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे.ग्रामीण भागातील रुग्ण तसेच आरोग्य कर्मचारी यांना अखंडित वीजपुरवठा,स्वच्छ पाणी व पर्यावरणपूरक सुविधा यांचा थेट फायदा होणार आहे.या पायाभूत सुविधा आरोग्य व्यवस्थेतील कार्यक्षमता वाढविण्यास हातभार लावणार आहेत.
यावेळी मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सौर ऊर्जेच्या वापरामुळे आरोग्य केंद्रांना मिळणाऱ्या शाश्वत उर्जेचा आणि स्वच्छ पाण्याच्या सुविधेचा सकारात्मक परिणाम ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर होईल,असे प्रतिपादन केले.
दरम्यान,जिल्ह्यातील तुळजापूर व परांडा तालुक्यातील ५४ आरोग्य संस्थांमध्ये NCD क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत.या क्लिनिकचे उद्घाटन १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन पद्धतीने पालकमंत्री यांच्या हस्ते झाले.या क्लिनिकमुळे नागरिकांना मधुमेह,उच्च रक्तदाब, हृदयविकार व कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची तपासणी व निदान ग्रामपातळीवर उपलब्ध होणार आहे.ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळून त्यांचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला आ. राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील, खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, विधानपरिषद सदस्य आ.सतीश चव्हाण,आ.विक्रम काळे, विधानसभा सदस्य आ.कैलास घाडगे पाटील, आ.तानाजीराव सावंत व आ.प्रविण स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम,तंत्रस्नेही व शाश्वत बनणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे.