तुळजापूर (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून महायुती सरकारकडून विक्रमी 1865 कोटी रुपयांचा निधी तिर्थक्षेत्र तुळजापूरच्या मंदिर परिसर व शहर विकासासाठी मंजूर करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निधी मिळवून दिल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हस्ते आणि शहरवासीयांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्कार सोहळा दिनांक 7 मे 2025 रोजी आयोजित केला आहे. अशी माहिती पत्रकार परिषद घेवून भाजप युवानेते विनोद गंगणे यांनी दिली आहे. तर या सत्काराला महाविकास आघाडीच्यावतीने ऋषिकेश मगर आणि अमोल कुतवळ यांनी पत्रकार परिषद घेवून विरोध केला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्काराचा कार्यक्रम आखला जात आहे. असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. 1865 कोटींच्या विकासकामांची पूर्तता झाल्यानंतर सत्कार घ्या. त्यावेळी आम्हीही सहभागी होऊ, असे वक्तव्य महाविकास आघाडीचे रुषीकेश मगर व अमोल कुतवळ यांनी पत्रकार परिषदेत केले.
महाविकास आघाडीचे रुषीकेश मगर, अमोल कुतवळ, आनंद जगताप आणि रणजित इंगळे यांनी संयुक्तपणे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, हा सत्कार कार्यक्रम मागील चार महिन्यांत घडलेल्या अनेक वादग्रस्त घटनांवर पांघरूण टाकण्यासाठी आहे. विशेष म्हणजे विलासराव मुख्यमंत्री असताना तुळजापूर तिर्थक्षेत्र विकास अंतर्गत 315 कोटी रूपये मंजूर करून दिले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मधुकरराव चव्हाण यांनी सत्कारास नकार दिला होता.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार
पुढील 200 वर्षांची भाविकसंख्या लक्षात घेऊन श्रीतुळजाभवानी मंदिर परिसर व तुळजापूर शहरातील पायाभूत सुविधांचा व्यापक विकास, शहराचा चेहरामोहरा बदलणार, अर्थकारणाला चालना मिळणार, भाविकांसाठी पार्किंग, स्वच्छता, निवास, पाणीपुरवठा, सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.
सध्या 1865 कोटींपैकी 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्यातून कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकात बावनकुळे यांच्या हस्ते तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्कार करण्याचे निश्चित केले आहे. अशी माहिती युवा नेते विनोद गंगणे, माजो नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, नरेश अमृतराव यांनी दिली आहे.