तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील शेतकऱ्यांनी पुनर्वापरा योग्य ऊर्जा निर्माण करणाऱ्या पवनचक्की कंपन्यांच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. प्रकल्पांकरिता जमीन वापराच्या मोबदल्यामध्ये असणाऱ्या तफावतीच्या मूळ मुद्द्यावरून हे आंदोलन छेडण्यात आले होते. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करते शेतकरी आणि कंपनी प्रतिनिधी यांच्या दरम्यान महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सेरेंटीका रिन्यूएबल्स कंपनीने शेतकऱ्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सकारात्मकता दाखवली. तर रिन्यू कंपनीने मग्रुरी दाखवत या बैठकीकडे चक्क पाठ फिरवली.

या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली. आंदोलन करते  शेतकऱ्यांनी पवनचक्की निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत झालेल्या कराराच्या बाबत संशय उपस्थित केल्यानंतर 11 ऑगस्टपर्यंत झालेल्या कराराचे बाबत पारदर्शकता समजावून सांगण्याकरता मुदत देण्यात आली आहे. सेरेंटिका रिन्यूएबल या कंपनीच्या प्रतिनिधींनी प्राप्त सर्व करार शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचे मान्य केले. तसेच ज्या ठिकाणी जमीन मोबदला भावावरून अस्पष्टता आहे त्या ठिकाणी कंपनी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या संयुक्त वतीने सर्वे करून जमीन वापर मोबदला अंतिम करण्याबाबत ठरले आहे.

सेरेंटिका रिन्यूएबल्स यांच्या वतीने असे सांगण्यात आले की संयुक्त सर्वे नंतर जिल्हाधिकारी जमीन वापर मोबदल्याबद्दल जो निर्णय देतील तो कंपनीला मान्य असेल. वास्तविक या ठिकाणी समान मोबदला मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीला केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरचे अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीला रिन्यू कंपनीने प्रतिनिधी पाठवण्याचे धारिष्टे दाखवले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीवरती तीव्र नाराजी दर्शवली.

शेतकऱ्यांसोबत झालेले करार नामे इंग्रजी भाषेमध्ये आहेत. याबाबत देखील काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. या समस्ये वरती समाधान शोधण्याच्या हेतूने सेरेंटीका कंपनीच्या वतीने कराराच्या भाषांतरित प्रती देखील शेतकऱ्यांना देण्यात येतील असे अभिवचन दिले.सेरेंटिका रिन्यूएबल्स यांनी दाखविलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलक शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

 
Top