धाराशिव (प्रतिनिधी)- मोकाट, पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा कुत्र्यांमुळे धाराशिवकर जनता त्रस्त झाली असून लहान मुले, वृद्धांना बाहेर फिरणे मुश्किल झाले आहे.  त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करा अन्यथा जिल्हाधिकारी व नगर परिषद कार्यालयात कुत्रे सोडण्यात येतील असा इशारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) च्या वतीने देण्यात आला आहे.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील तीन वर्षे नगर पालिकेवर प्रशासक असल्यामुळे सर्व कारभार मुख्याधिकाऱ्यांच्या अधिकारावर चालतो. या काळात धाराशिव शहरवाशीयांचे इतके हाल चालु आहेत की, त्यांना कोणीच वाली उरला नाही. स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. त्यात संपूर्ण शहरात मोकाट, पिसाळलेल्या कुत्र्यांचा या अस्वच्छतेमुळे वावर वाढला असून त्यांची शहरात इतकी संख्या झाली आहे की, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले यांना या पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे बाहेर फिरणेही मुश्कील झाले आहे. मागील वर्षी खाजा नगर भागात पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे एकाला जीव गमवावा लागला. वेळोवेळी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याशी निवेदनाद्वारे तसेच मागील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतीत मिटींग घेवुनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आठवडाभरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर पालिकेला आदेशित करुन कायमचा बंदोबस्त करावा. अन्यथा शहर राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षामार्फत शहरातील मोकाट, पिसाळलेली कुत्री स्वखर्चाने पकडून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नगर पालिका कार्यालयामध्ये सोडण्यात येतील, कार्यालयातील कर्मचाऱ्याना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यास त्यास शासन जबाबदार असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रणवीर इंगळे, आयाज शेख, एजाज काझी, पृथ्वीराज चिलवंत, खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, पंकज भोसले,  धनंजय शहापूर, कुणाल कर्णवर,  महादेव माळी, शाहनवाज सय्यद, जयंत देशमुख, सुरज वडवले,  सरफराज कुरेशी, ज्योती माळाळे  आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top