तेर (प्रतिनिधी)- सांडू प्रतिष्ठान' मुंबई, यांचा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार तेर येथील रहिवासी प्रतिभा पद्माकर जगदाळे यांच्या 'गोफ' या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.
परीक्षक मंडळाने परीक्षण करून हा पुरस्कार जाहीर केला आहे. शब्दशिवार प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ, सुप्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन यांनी रेखाटले आहे. ज्येष्ठ व्याकरण गुरु चारुदत्त मेहरे यांची प्रस्तावना लाभलेल्या या काव्यसंग्रहाची पाठराखण ज्येष्ठ भाषाविज्ञान अभ्यासक प्रा. डॉ. विष्णू वासमकर यांनी केली आहे.या काव्यसंग्रहामध्ये भुजंगप्रयात, इंद्रवज्रा, वसंततिलका वगैरे वृत्तांमध्ये लिहिलेल्या कविता आहेत. त्याचप्रमाणे यमक, उपमा, दृष्टांत वगैरे अलंकारावर आधारित कविताही समाविष्ट आहेत. त्या आपल्या सौंदर्याने रसिकांना मोहिनी घालताना दिसतात.'गोफ' हा काव्यसंग्रह अलंकार आणि वृत्त यांच्या अभ्यासकांसाठी आणि अलंकारवृत्तांत कविता लिहिणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
प्रतिभा जगदाळे यांची कादंबरी, ललितलेखन, विनोदीलेखन, चरित्रलेखन, लोकसाहित्य, बालसाहित्य अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील एकूण नऊ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या 'मुक्ता' या कादंबरीचा 'कर्नाटक विद्यापीठ, धारवाड' येथे बी. ए. भाग 2 च्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे.