वाशी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या मार्फत आयोजित तालुकास्तरीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला दिनांक 25 ऑगस्ट रोजी वाशी येथे सुरुवात झाली. ही स्पर्धा कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक त्रिपाठी यांनी केले. या वेळी बोलताना मुख्याध्यापक वाघोलीकर यांनी वाशी तालुक्यात शालेय स्तरावर तब्बल 10 प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात येत असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी होत असल्याचे सांगितले. तर प्राचार्य डॉ. कदम यांनी महाविद्यालयाच्या क्रीडांगणाचा उपयोग उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी करावा व त्यासाठी महाविद्यालय सदैव सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमात पंच म्हणून सुनील आवारे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजितकुमार तिकटे यांनी केले तर आभारप्रदर्शन क्रीडा शिक्षक शशिकांत सरवदे यांनी मानले. या वेळी विद्यार्थी, खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह, आनंद आणि क्रीडामय वातावरणात या तालुकास्तरीय स्पर्धेची सुरुवात झाली.