भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील उळूप व चिंचोली या गावांना धाराशिव जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी अचानक भेट दिल्याने प्रशासनात मोठी हलचल उडाली. जिल्हाधिकारी यांचा हा दौरा नियोजित नसल्याने माहिती मिळताच तहसील प्रशासन व इतर अधिकारी तत्काळ पाहणीसाठी दाखल झाले.
या दौऱ्यात जिल्हाधिकारी पुजार यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष घोष, जिल्हा कृषी अधीक्षक आसलकर भूमचे तहसीलदार जयवंत पाटील, मंडळाधिकारी विद्याधर कोळी, तसेच कृषी अधिकारी अतुल ढवळे, पंचायत समिती गट विकास अधिकारी एल. आर. वाजे, तलाठी, आणि कृषी सहाय्यक, ग्रामसेवक हे ही उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून जिओ ट्रेकिंगसह फोटो अपलोड करावेत. तसेच शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबरच फळबाग लागवडीकडे वळावे, जलतारा खड्डे घेऊन पाणी साठवावे आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेत नवीन बागायती हंगामाचा विचार करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
दोन गावांची पाहणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार परांडाकडे पुढील गावाच्या भेटीसाठी रवाना झाले. अचानक झालेल्या या दौऱ्यामुळे प्रशासनात दमछाक झाली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या त्वरित निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.