धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव धुळे सोलापूर महामार्गावरील धाराशिव शहराचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक ते शिंगोली विश्रामगृह हा मार्ग रहदारीचा बनला आहे. याठिकाणी दोन उड्डाणपूल असून त्या ठिकाणी पथदिवे बसविण्यात आले नव्हते. नागरिकांच्या मागणीप्रमाणे कंपनीकडून हे काम आता करून घेत असून, दुसऱ्या बाजूचे पथदिवे लवकर बसविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी दिली आहे.
या मार्गांवर वाहतूक कोंडी, अंधार आणि वारंवार होणारे अपघात यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक होते. या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली होती. अखेर संघर्षाला यश मिळाले असून सर्व्हिस रोड पूर्ण झाला आहे तर अंडरपासची कामे सुरूवातीच्या टप्प्यात आली आहेत.मात्र पथदिवे उड्डाणंपुलावर न बसवता त्या खालील रस्त्यावर बसविण्याची तयारी सुरु होती तेव्हा त्यांना रोवलेले खांब काढून ते पथदिवे उड्डाणंपुलावर बसविण्यास सांगितले होते. त्यानुसार आता एका बाजूचे दिवे बसविले आहेत. दुसऱ्या बाजूचेही दिवे लवकर बसविले जाणार आहेत.
पथदिवे बसवण्याचे काम सुरू असल्याने परिसर उजळू लागला आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरील दोन्ही उड्डाणपुलांवरही पथदिव्यांची उभारणी आंदोलने झाल्यानंतर सुरू झाली आहे. राजर्षी शाहू महाराज चौक, वीर शिवा काशीद चौक, माता रमाई चौक, संत काशीबा महाराज चौक या तीनही चौकात होणारे गैरप्रकार आता थांबणार आहेत. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. चोरीचे प्रकार, छेडछाडीसारख्या घटनाना देखील यामुळे आळा बसण्यास मदत होईल. या मार्गांवरील सर्व कामे पूर्ण होईपर्यंत महाविकास आघाडीचे लक्ष असून ही कामे तातडीने करण्यासाठी सुद्धा पाठपुरावा करत असल्याच सोमनाथ गुरव यांनी सांगितले आहे.
पाठपुराव्याला आले यश
महाविकास आघाडी कडून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील राष्ट्रीय महामार्ग प्रशासन तसेच आय.आर.बी.कंपनीला पत्र दिले होते.