वाशी (प्रतिनिधी)-  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव यांच्या वतीने आयोजित “माध्यमिक स्तरावरील जिल्हास्तरीय कला उत्सव 2025-26” ही स्पर्धा धाराशिव येथे “विकसित भारत 2047 मधील भारताची कल्पना” या विषयावर पार पडली. जिल्ह्यातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.या स्पर्धेत अंकुरम विद्या मंदिर, वाशी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय व नेत्रदीपक कामगिरी करत शाळेचा नावलौकिक अधिक उंचावला.

एकल शास्त्रीय नृत्य या कलाप्रकारात सृष्टी गणेश उंदरे हिने अप्रतिम व देखणे नृत्यसादरीकरण करून परीक्षकांची मने जिंकली आणि जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. सांघिक प्रादेशिक लोकनृत्य या प्रकारात ज्ञानेश्वरी पांडुरंग बेलदार, वैष्णवी शिवाजी कवडे व आराध्या अप्पासाहेब गायकवाड या विद्यार्थिनींनी अत्यंत समन्वयपूर्वक व जोशपूर्ण नृत्य सादर केले. या सादरीकरणाला परीक्षकांकडूनही दाद मिळाली आणि या संघाने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या यशामागे अंकुरम विद्या मंदिरच्या सहशिक्षिका अश्लेषा खोसे, समन्वयक  मीनाक्षी थोरबोले (जाधव) व सोनल जैन यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

संस्थाचालक डॉ. विनोद पवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक केले. 

 
Top