भूम (प्रतिनिधी)-  आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण कायदा व सुव्यवस्था, सामाजिक शांतता व सौहार्द टिकवून सर्वांनी आनंदाने व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन भूम डीवायएसपी अनिल चोरमुले यांनी केले.

पंचायत समिती सभागृह, भूम येथे गणेशोत्सव शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार जयवंत पाटील, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली चाकेते, महावितरणचे अधिकारी लक्ष्मण शिंदे, पोलीस निरीक्षक श्रीगणेशा कानगुडे, उपनिरीक्षक सय्यद अख्तर, संजय झाराड यांच्यासह अग्निशमन, वीज वितरण, पाणीपुरवठा, परिवहन व नगरपरिषद यांचे अधिकारी उपस्थित होते. गणेश मंडळांचे अध्यक्ष, माजी सैनिक संघटना आणि मान्यवर नागरिकही बैठकीस हजर होते.

डीवायएसपी चोरमुले यांनी यावेळी डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्वच्छता राखणे, ध्वनीप्रदूषण टाळणे, विजेची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. “माझं भूम, सुरक्षित तालुका“ हा उपक्रमही यावेळी जाहीर करण्यात आला.

एसपी कॉलेजच्या प्राध्यापकांनी कवितेच्या आधारावर मंडळांना शपथ दिली. तहसीलदार व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासन निर्णयानुसार उत्सवाचे मार्गदर्शन केले. यंदा राज्य महोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट देखावे व पर्यावरणपूरक उपक्रम यावर भर देण्यात आला. गणेशोत्सवातील उत्कृष्ट देखाव्यासाठी तालुक्यातून प्रथम क्रमांकाच्या मंडळाला 25 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. सर्व मंडळांनी उत्कृष्ट देखावे, स्वच्छता आणि सामाजिक संदेश यावर भर द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

 
Top