भूम (प्रतिनिधी)- भांडवलशाहीमुळे हातमाग विणकर व्यवसाय मोडीत निघाला आहे . या समाजाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी शासनाने हातमाग विणकर महामंडळाचे नेतृत्व कोष्टी समाज बांधवांकडे द्यावं अशी मागणी राष्ट्रीय हातमाग विणकर दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ हातमाग विणकर अशोक बोत्रे यांनी केली.
गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी समस्त कोष्टी समाज ट्रस्टच्यावतीने राष्ट्रीय हातमाग विणकर दिन साजरा केला. यावेळी समाजातील अंबादास वरवडे, बाबुशा दिवटे, सुरेश खामकर, पाडूरंग वरवडे, प्रकाश बागडे, सुरेश उपरे, मधुकर म्हैत्रे, आबा नवले, बाळासाहेब फासे, जोतीराम आलगट, शाम दिवटे, अशोक बोत्रे, गोकूळ आसलकर, बाबूराव आलगट, मोतीलाल आसलकर, पांडूरंग बुगड या ज्येष्ठ 16 हातमाग विणकर बांधवांचा सन्मान केला. दरम्यान हातमागाचे सुटे भाग रहाट, कांडी, चरखा, सुत कळी, गुपणं पाव, आटणी, थापा, गोल फणी, धोटा याची पूजा केली.
भांडवलशाहीमुळे हातमाग विणकर व्यवसाय मोडीत निघाला, हातमाग व्यवसाय कोष्टी समाजासाठी जगण्याचा आधार होता. हा व्यवसाय कसा होता, आत्मा काय आहे. याचसाठी आता हात मागाचे सर्व साहित्य दुर्मिळ होऊ लागत्याने ते आज खऱ्या अर्थाने जेवढे अवशेष आहेत ते संकलन करून ठेवले आहेत. त्या हातमागाच्या सुट्या भागाचे प्रत्येक वर्षी राष्ट्रीय हातमाग दिनी पूजन केले जाते.
हातमाग विणकर व्यवसाय जागृत राहावा, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी शासनाने विणकर महामंडळाची स्थापना केली. या विणकर महामंडळाच्या माध्यमातून नको त्या नेत्यांनी पोळ्या भाजण्याचा प्रयत्न केला. परंतु या महामंडळाचा खऱ्या अर्थाने हक्क कोष्टी समाजाच्या हातमाग विणकरांचाच असताना इतर नेत्यांना, पुढाऱ्यांना या महामंडळाचे नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे. तेव्हा शासनाने नेतृत्वाची संधी कोष्टी समाजातील हातमाग विणकरांनाच मिळावी, राष्ट्रीय हातमाग विणकर दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी लेखी निवेदनाव्दारे मागणी राज्य शासनाकडे केली.
या कार्यक्रमा दरम्यान श्याम दिवटे या 80 वर्षे वयाच्या हातमाग विणकर बांधवानी आवर्जून विणकर व्यवसाय संदर्भात सविस्तर माहिती दर्शवणारी 1997 ची मोठी स्मरणिका कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
देवांग कोष्टी समाज ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल महादेव बागडे, सचिव शंकर विठ्ठल खामकर, उपाध्यक्ष शाम तुकाराम वारे, सदस्य आण्णा भागवत, सागर टकले, नवनाथ विलास रोकडे, योगेश आसलकर, सुरज फलके, चौंडेश्वरी तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष दत्ता वैद्य, धनंजय बागडे, आतूल उपरे, शिवाजी बागडे, योगेश दिवटे, पप्पू आसलकर यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन ट्रस्ट सचिव शंकर खामकर यांनी केले. तर अध्यक्ष विठ्ठल बागडे यांनी आभार मानले.