धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरातुन जाणारा बार्शी बोरफळ राज्य मार्गाचे लवकर सुरु करावे तसेच यामध्ये फक्त रस्तेच नव्हे तर दोन्ही बाजूने नाल्या, रस्त्यामध्ये दुभाजक, फुटपाथ व दिवाबत्तीचीही तरतूद करावी. तसेच राजमाता जिजाऊ चौक ते उंबरे कोटा या मंजूर रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, शहरातील 140 कोटीतून होणाऱ्या 59 डीपी रस्त्यांचीही कामे हाती घ्यावीत या प्रमुख या मागण्यासाठी धाराशिव शहर वासियांनी आर. पी. कॉलेज समोर रास्ता रोको आंदोलन केले. यामध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 “आक्रोश रस्त्यांचा  हक्क जनतेचा” अशा घोषणा देत शेकडो नागरिक रस्त्याची कामे व्हावीत या मागणीसाठी रस्त्यावर उतरली.

बार्शी धाराशिव बोरफळ राज्य मार्ग शहरातून जात आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश नऊ ऑक्टोबर 2024 रोजी निघाला आहे.  राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा गावापर्यंत दोन्ही बाजूने नाल्या, दुभाजक व दिवाबत्ती या सोयीचा समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. राजमाता जिजाऊ चौक ते उंबरे कोटा हा रस्ता देखील मंजूर असून त्याचेही काम तातडीने करावे तसेच शहरातील 140 कोटीच्या 59 डीपी रस्त्याची निविदा प्रक्रिया होऊनही काम होत नव्हते. तेव्हा जन आंदोलन करून व उपोषणाचे हत्यार उपसल्यावर प्रशासन जागे झाले होते. पण पुन्हा त्याला विलंब होत असून त्याचेही स्मरण या आंदोलनात करून दिले आहे. शिवाय या राज्य मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होण्याअगोदर रस्त्यावरील खड्डे पाऊस असेल तर सिमेंट काँक्रेटन बुजवावे, पाऊस असेल तर डांबरीकरणातून रस्त्याची दुरुस्ती करावी असेही निवेदनात म्हटले आहे.


प्रशासनाने दिले लेखी उत्तर

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांनी पत्रात म्हटले की, राजमाता जिजाऊ चौक ते सांजा या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली, फुटपाथ, पथदिवे व दुभाजक ही अधिकचे कामे समाविष्ट करण्यासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे. त्याच अंदाजपत्रक बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुधारित प्रशासकिय मान्यता मिळाल्यानंतर काम हाती घेण्यात येईल.

कंत्राटदारास रस्त्यावरील खड्डे स्थापत्य अभियांत्रिकी व प्रचलीत पद्धतीनुसार तात्काळ भरण्याचे आदेश देण्यात आल्याचं लेखी कळविले आहे.


जिजाऊ चौक ते उंबरे कोटा या रस्त्यावरील खड्डे पावसाची उघडीप मिळताच डांबरीकरण करून बुजवण्यात येतील, असं लेखी आश्वासन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिलं आहे.   यावेळी शहरातील नागरिक व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top