धाराशिव (प्रतिनिधी)- लेखकाने अस्वस्थ करणारे लेखन करायला हवे.डॉ. मुरहरी केळे यांचा 'नानी ' हा त्यांच्या आईवरील चरित्रग्रंथ अस्वस्थ करणारा असून, त्यात मराठवाड्यातील ग्रामीण भागातील कष्टाळू स्त्रीचे आयुष्य डॉ.केळे यांनी अतिशय सुंदर आणि प्रभावी पद्धतीने रेखाटले आहे. त्यावर हरिभाऊ कवडे यांनी “नानी: आकलन आणि आस्वाद“ हा समीक्षाग्रंथ त्याच ताकदीने लिहून त्याला भक्कम आधार दिला आहे. चरित्र हे एखाद्या व्यक्तीचं नसतं, तर ते संस्कृती,परंपरेसह त्या परिसराचा इतिहासही असते,असे विचार कवी आणि समीक्षक डॉ.पी.विठ्ठल यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे हे होते. यावेळी डॉ.मुरहरी केळे, महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर, डॉ.निर्मोही फडके, प्रा.मुकुंद वलेकर, हरिभाऊ कवडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ.निर्मोही फडके म्हणाल्या की, कोणत्याही साहित्यिकाची साहित्यकृती प्रकाशित झाल्यानंतर ती लेखकापुरती मर्यादित राहत नाही. त्या कलाकृतीवर चांगल्या व टीकात्मक प्रतिक्रिया येतात. लेखकाने त्याचे स्वागत केले पाहिजे. 'नानी 'हा उत्तम चरित्रग्रंथ असून,हरिभाऊ कवडे यांनी समीक्षाग्रंथात उत्तम मांडणी करून वाचकांच्या ज्ञानात भर घातली आहे.
समारोप प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना माजी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे म्हणाले, 'नानी ' हा चरित्रग्रंथ अत्यंत साध्या- सोप्या भाषेत असून, वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद या चरिञ ग्रंथात आहे डॉ. मुरहरी केळे व हरिभाऊ कवडे यांच्या लेखनातून ते सिद्ध झाले आहे. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर, लेखक आनंदा टकले व कवी गोविंद काळे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दैवत सावंत यांनी केले. आभार डॉ. शिवाजी तिकांडे यांनी मानले.