धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडवणारी घडामोड आज मुंबईत घडली. काँग्रेसचे माजी उमेदवार व प्रदेश सचिव दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेस समितीचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेसच्या विविध पातळ्यांवरील दिग्गज पदाधिकारी एकत्रितपणे भाजपमध्ये दाखल झाले. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सभापती, उपसभापती, नगरपंचायत अध्यक्ष किसनराव कांबळे,सुभाष राजोळे, चंद्रशेखर पवार, संगिताताई कडगंचे, सचिन पाटील, दगडू मोरे,डॉ. विक्रम जिवनगे आणि प्रेमलता टोपगे यांचाही समावेश होता. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार प्रकाश भारसाकळे, माजी मंत्री व लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील उपस्थित होते. त्यांनी सर्व नवख्यांचे पक्षात मनापासून स्वागत करत भाजपचा झेंडा त्यांच्या हाती सोपवला.
या प्रवेशामुळे उमरगा-लोहारा मतदारसंघात काँग्रेसचे संघटनात्मक कणा कोसळल्याचे चित्र असून, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा विजयमार्ग अधिक सुलभ झाला आहे. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.