धाराशिव,(प्रतिनिधी)- पावसाळा आणि वादळी वाऱ्याच्या दिवसांत वीजेच्या तारा व पोल तुटून पडण्याच्या घटना वाढतात. अशा वेळी नागरिकांनी वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, कोणतीही तुटलेली वीजतार किंवा पोलला स्पर्श करू नये, अशी सूचना महावितरणने केली आहे.
पावसाळ्यात व वादळी वाऱ्यात वीजेचे खांब, तारा तुटून शेतात, रस्त्यावर किंवा घराजवळ पडल्यास त्या ठिकाणापासून लांब राहावे. यामध्ये वीजप्रवाह सुरू असण्याची शक्यता असल्याने अशा तारा किंवा पोलला हात लावणे जीवघेणे ठरू शकते. त्वरित महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, किंवा टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी.”
महावितरणकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतर्कता बाळगली जात असून, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पुरवली जाते. नागरिकांनी कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी वीज यंत्रणेशी संबंधित खबरदारी घ्यावी, असेही महावितरणने सांगितले.
महावितरण आपत्कालीन संपर्क क्रमांक: टोल फ्री – १९१२ धाराशिव जिल्ह्यासाठी कंट्रोलरूमच्या ७८७५२११६१५ या क्रमांकावर त्वरीत कळवावे. या क्रमांकावर व्हॉटसअप सुविधाही उपलब्ध तरून देण्यात आलेली आहे.
पावसाळ्यात वीजेच्या यंत्रणेपासून सुरक्षित राहण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात:
विजांचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून मुख्य वीज कनेक्शनपासून वेगळे करावे. घरातील अर्थिंग नीट आणि सुस्थितीत ठेवावी, गरजेनुसार तपासणी करावी. जमिनीवर तुटलेल्या किंवा लोंबकळणाऱ्या वीजतारांना स्पर्श करू नये, त्वरित महावितरणाला माहिती द्यावी. कपडे वाळविण्यासाठी किंवा इतर वापरासाठी लोखंडी तारांचा वापर टाळावा, कारण त्या वीजतारांच्या संपर्कात आल्यास अपघात होऊ शकतो. घरातील स्वीचबोर्ड, फ्यूज बॉक्स आणि विद्युत उपकरणे पाण्यापासून सुरक्षित ठेवावीत, ओले हातांनी उपकरणे हाताळू नयेत. विजेच्या उपकरणांवर पावसाचे पाणी नजरेत येताच त्वरित ते बंद करावे आणि प्लग काढून ठेवावे.
घरातील दूरचित्रवाणी डिश व अँटेना वीजतारांपासून दूर ठेवावेत. विजा चमकताना घराबाहेर न पडता, विद्युत उपकरणे वापरणे टाळावे, धातूच्या वस्तूंपासून दूर राहावे. वीजतार किंवा पोल तुटल्यास किंवा पडल्यास त्याजवळ जाऊ नये, त्वरित संबंधित वीज कार्यालयाला कळवावे. पावसाळ्यात झाडे, फांद्या कोसळल्यामुळे तुटलेल्या तारांकडे विशेष लक्ष द्यावे आणि सुरक्षित अंतर ठेवावे. या उपाययोजनांमुळे पावसाळ्यात विद्युत अपघात टाळता येऊ शकतात आणि सुरक्षितता वाढते.