भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील श्री चौंडेश्वरी तरुण गणेश मंडळांनी यावर्षी 80 व्या वर्षात शहराच्या प्रमुख मार्गाने तिरंगा रॅली काढून गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतलं . यावर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव संपन्न होत असल्याची माहिती मंडळाध्यक्ष दत्ता वैद्य यांनी दिली.
बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी शहरातील मानाचा समजला जाणारा श्री चौंडेश्वरी तरुण एकता गणेश मंडळ 80 व्या वर्षात गणेश उत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने दोन दिवसापूर्वी शहरातील वरद गणेश मंदिर, चौंडेश्वरी मंदिर, श्रीक्षेत्र आलम प्रभू देवस्थान परिसराची स्वच्छता करून वृक्षारोपण केले.
मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मंडळ पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र भारताच्या 79 वर्षे व मंडळाचे 80 व्या वर्षातील गणेश उत्सव साजरा करत असताना प्रथम तालुक्यातील सर्व माजी सैनिकांना निमंत्रित करून शहराच्या प्रमुख मार्गाने भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा घोषणा देत शांततेचा संदेश देणारे भव्य तिरंग यात्रा, रॅली शहराच्या प्रमुख मार्गाने काढली. यावेळी नागरिकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते.
उत्सवा दरम्यान रक्तदान शिबिर, धार्मिक, अध्यात्मिक मनोरंजन पर एकांकिका, हभप विजय बागडे महाराज, हभप. सोमनाथ बाबर महाराज यांच्या कीर्तनाचा प्रबोधन पर कार्यक्रम आयोजित केला आहे. याचाही गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करत अध्यक्ष दत्ता वैद्य व नवनाथ रोकडे उपाध्यक्ष यांनी यावर्षी विसर्जना दरम्यान डॉल्बीमुक्त मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकी दरम्यान मनमोहक, आकर्षक, विनोदी देखावे देखील सादर केले जाणार असल्याचे सांगितले.