धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या स्वच्छता कामगारांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके व समस्त विजय चौक तरुण गणेश मंडळ मित्रपरिवार यांच्या वतीने आज विजय चौक येथे विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत तब्बल १०० स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.
पडत्या पावसात नागरिकांच्या आरोग्यासाठी जीव धोक्यात घालून शहराची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पावसामुळे होणाऱ्या त्रासापासून दिलासा मिळावा, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. या वेळी सुरज साळुंके यांनी सांगितले की –
"स्वच्छता कामगार हेच खरे शहराचे आधारस्तंभ आहेत. पावसात भिजूनही ते शहर स्वच्छ ठेवतात. त्यांच्या सोयी-सुविधांसाठी व सन्मानासाठी शिवसेना नेहमीच पुढाकार घेईल."
या उपक्रमावेळी कृष्णा साळुंके, आनंद मोरे, गागण आगलावे, आकाश माळी, तानाजी निंबाळकर, महेश देवकते, नाना चंदणे, बालाजी राऊत, तेजस नवले, बबलू वंडरे, जगदीश मडके, राहुल मोरे, हणमंत शिंदे, दिनेश तुपे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. गणेशोत्सवाच्या पावन निमित्ताने घेतलेला हा उपक्रम शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे