धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील खिरणी मळा परिसरात 2016 पासून बंद असलेली नगर परिषद शाळा क्र. 5 ची इमारत आज गंज व घाणीचे साम्राज्य बनली आहे. स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या इमारतीमध्ये आरोग्य केंद्र, अंगणवाडी/शाळा किंवा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका (वाचनालय) सुरु करण्याची मागणी केली आहे.

सदर शाळा बंद झाल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून, काही व्यसनी लोक येथे बसून दारू, सिगारेट, गांजा सेवन करीत असल्यामुळे वातावरण दूषित झाले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, हीच इमारत आरोग्य केंद्र, दवाखाना, अंगणवाडी किंवा विद्यार्थ्यांसाठी वाचनालय म्हणून वापरल्यास परिसर सुशोभित होईल किंवा नागरिकांना आरोग्य सुविधा मिळतील तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देखील मिळतील.

या निवेदनावर आयाज शेख, मुसव्वीर मोमीन, अफोरज पठाण, रनविर इंगळे, रिजवान पठाण, शेखर घोडके, सरताज कुरेशी, आदिल कुरेशी, शेख असिम, अरबाज पठाण, शेख हुजेफा, तांबोळी आबुहुरेर, आमेर काझी, सय्यद अरबाज यांच्यासह अनेक नागरिकांनी सह्या करून आपला पाठिंबा दर्शविला आहे. नागरिकांच्या या मागणीवर जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील लोकांचे लक्ष लागले आहे.

 
Top