धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात यंदा पाऊसमान चांगले झाले असून विजेअभावी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत यासाठी आताच उपाययोजना कराव्या अश्या सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केल्या आहेत. 

धाराशिव जिल्ह्यातील हंगामात येणाऱ्या विजेच्या अडचणी संदर्भात बैठक घेण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली होती. त्यानुसार पार पडलेल्या बैठकीत बोर्डीकर यांनी हे आदेश दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार कैलास पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  बैठकीत आरडीएसएस व अन्य योजने अंतर्गत होणाऱ्या कामाचा आढावा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्यात आरडीएसएसएडीबी अंतर्गत नवीन 24 उपकेंद्र (सबस्टेशन) मंजूर आहेत. पाच मेगा वॅट चे अतिरिक्त पॉवर ट्रांसफार्मर 40 उपकेंद्रा मधे बसवण्यात येणार असून, तीनचे पाच मध्ये, पाचचे दहा मेगा वॅट मध्ये क्षमतावाढ करणे अशी दहा उपकेंद्र या सर्व कामांचा तपशीलवार प्रकल्प अहवाल अंतिम करून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ती कामे लवकर सुरु करावीत अश्या सूचना देण्यात आल्या. आजही काही शेतातील फिडरना एक -दोन दिवस आड विद्युत पुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळत नाही. दिवसा शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध व्हावी यासाठी योजना मंजूर आहेत. परंतु ते लिंक लाईनची कामे संबंधित कंत्राटदाराकडून वेळेवर होत नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. अश्या कंत्राटदारा कडून ही कामे कालमर्यादेत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

निरंतर योजनेअंतर्गत शेतातील ओव्हरलोड असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त 100 किलोवॅट  ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा. ज्या वस्तीवर वीज नाही त्या ठिकाणी एनएससी अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रक बनवावे. त्याची मंजुरी घेऊन ट्रांसफार्मर बसवून वस्तीवर विज कनेक्शन द्यावे. मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी योजने अंतर्गत 10 उपकेंद्र मंजूर आहेत त्याची कामे लवकर करून घ्यावीत आणि पहिले ट्रांसफार्मर अतिरिक्त भार असणाऱ्या ठिकाणी वापरावेत अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. बैठकीला महावितरणचे संचालक (मानव.संसाधन) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक (प्रकल्प) धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता संजय आडे, मुख्य कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.                          


 
Top