धाराशिव (प्रतिनिधी)-  ज्या जमिनी औद्योगिक विकासाच्या आशेने अनेक वर्षांपूर्वी  साठी देण्यात आल्या होत्या, त्याच वडगाव सिद्धेश्वर (ता. जि. धाराशिव) येथील जागेवर आता धाराशिव आणि तुळजापूर येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. 'कचरा प्रकल्प रद्द करून त्या जागेवर प्रदूषणरहित उद्योग उभारून स्थानिकांना रोजगार द्यावा,' अशी मागणी करत गावकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्याचा जो प्रस्ताव आहे, त्याला वडगाव सिद्धेश्वर आणि परिसरातील जनतेने पूर्णपणे विरोध केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, वडगाव सिद्धेश्वर हे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे तीर्थक्षेत्र म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपूर्वी येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने  एमआयडीसीसाठी दिल्या होत्या. त्यावेळी त्यांना मोठे उद्योग येण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता याच जमिनींवर कचरा प्रकल्प उभारला जात असल्यामुळे याभागातील हवा, पाणी यामध्ये प्रदर्शन निर्माण होईल. त्यामुळे ग्रामस्थांनी विरोध केला आहे. 

 
Top