धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिबुद्धविहार हे बौद्ध समाजासाठी श्रद्धास्थान असून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर, नातू ॲड. बाळासाहेब आंबेडकर, रिपब्लिकन नेते ॲड. बी.सी. कांबळे, शांताबाई दाणी, माजी राज्यपाल आर. डी. भंडारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे. अणदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिबुद्ध विहारास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे.
या बुद्धविहारास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था, अणदूर यांच्यामार्फत ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 'क' दर्जा प्राप्त झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष मधुकर कांबळे, उपाध्यक्ष हरीभाऊ बनसोडे, श्याम कांबळे, मनोहर बनसोडे, गोरख कांबळे आदींनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेऊन बुद्धविहाराच्या उर्वरित बांधकामासाठी निधीची मागणी केली होती.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन एप्रिल 2025 मध्ये 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी धाराशिव यांना अधिकृत पत्र दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद, धाराशिव यांनी तात्काळ कार्यवाही करत अणदूर येथे बांधकाम स्थळाची पाहणी केली. यावेळी अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे, उपअभियंता टी.डी. पोळे, कनिष्ठ अभियंता एस.एस. काकडे उपस्थित होते.