धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघातामुळे झालेल्या मृत्यू,गंभीर दुखापत अथवा शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

दिनांक 16 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकूण 28 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.या प्रस्तावांनुसार विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यांवर 35 लाख 18 हजार 303 रुपये इतकी रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात आली.


मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांचा तपशील :

मृत्यूप्रकरणे  22 प्रस्ताव, रक्कम : 33,00,000/- रुपये. शस्त्रक्रिया  5 प्रस्ताव,रक्कम : 1,88,303/- रुपये. अवयव निकामी होणे  1 प्रस्ताव, रक्कम : 30,000/- रुपये.


तालुकानिहाय प्रस्ताव वितरण : धाराशिव  8,तुळजापूर  8, उमरगा  5,कळंब  3, भूम  3,परांडा  1 लोहारा व वाशी  0

या योजनेचा मुख्य उद्देश अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देणे आहे.सन 2012-13 पासून सुरु असलेली ही योजना सन 2022 मध्ये सुधारित करण्यात आली असून,त्याअंतर्गत सानुग्रह अनुदानाच्या रकमेची मर्यादा वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, 10 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या नव्या बैठकीत आणखी 29 नवीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावांसाठी एकूण 33 लाख 40 हजार 559 रुपये इतका निधी लवकरच पालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे,अशी माहिती संतोष माळी,उपशिक्षणाधिकारी (योजना),जिल्हा परिषद धाराशिव यांनी दिली.

 
Top