धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात वर्ग 2 च्या जमिनीबाबत राज्य सरकारने यापूर्वी जीआर काढले होते. त्यामध्ये काही अधिकारी किंतू, परंतु असे म्हणत आहेत. त्यामुळे वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये घेण्यासाठी अनेकांच्या समस्या कायम आहेत. जिल्हा प्रशासनाला याबाबत तुम्हाला कशा प्रकारे जीआर पाहिजे, त्याप्रमाणे जीआर काढून पाठवतो. असे सांगितले असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुरूवार दि. 7 व 8 ऑगस्ट रोजी महसूल मंत्री बावनकुळे धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. या पत्रकार परिषदेस आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जि.प. चे सीईओ मैनाक घोष, पोलिस अधीक्षक शफकत आमना आदी उपस्थिती होते.
सकाळी महसूलमंत्री यांनी जनता दरबार ही घेतला. या जनता दरबारमध्ये लोकांच्या 350 तक्रारी आल्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनासमोर ही चांगल्या प्रशासनाची बाब नाही असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बावनकुळे यांनी राज्यात महसूल अभियानचा आज शेवटचा दिवस असून, 35 विषयाला न्याय देण्यासाठी महसूल विभाग काम करीत असल्याचे सांगितले. जनता दरबारमध्ये आलेल्या 350 तक्रारींपैकी काही तक्रारी 48 तासात निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असलेले प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढा असे सांगितले आहे. बावनकुळे यांनी शेत रस्ते, पाणंद रस्ते व शिव रस्ते यावर महसूल विभागास काम करण्यास सांगितले आहे. शेत रस्ते कमीत कमी 12 फुटाचे करा व त्याची नोंद सातबारावर करण्यास सांगितले आहे. यापुढे जमीन खरेदीबाबत महसूल विभागाचे धोरण ठरले असून, आधी मोजणी नंतर खरेदी खत असे ठरले आहे. मोजणी विभागाला ऑनलाईन मोजणी करण्यासाठी 10 एजन्सी दिल्या आहेत. असे बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड. अनिल काळे आदी उपस्थित होते.
पवनचक्की बाबत धोरण ठरवणार
जिल्ह्यात सगळ्यात जास्त 285 तक्रारी अर्ज शेतकऱ्यांनी पवनचक्की कंपनीच्या बाबतीत दिल्या आहेत. याबाबत राज्य सरकार योग्य धोरण ठरविले व या धोरणानुसारच शेतकरी व पवनचक्की कंपनी यांचे व्यवहार जिल्हा प्रशासनासमोर होईल. त्यामुळे भविष्यात अशा तक्रारी राहणार नाहीत, असे बावनकुळे यांनी सांगितले. जिल्ह्यात कृत्रिम वाळू तयार करण्यासाठी 100 स्टोन क्रशर चालू करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे अशी माहितीही दिली.
लोकशाही दिन सुरू करा
जिल्ह्यातील लोकांच्या तक्रारी स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी गाव, तालुका व जिल्हास्तरावर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लोकशाही दिन सुरू करावेत. अशी सुचना आपण जिल्हा प्रशासनाला दिल्या असून, यामुळे लोकाभिमुख सरकार अशी प्रतिमा तयार होईल असे बावनकुळे ते म्हणाले. ग्रामीण महाराष्ट्रातील 60 टक्के प्रॉपटी कार्ड वाटप केले आहेत. शहरी विभागात हे काम होणे बाकी आहे. लवकरच ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करून प्रॉपटी कार्ड दिले जातील असेही बावनकुळे यांनी सांगितले.
48 तासात शाळेसाठी लागणारे प्रमाणपत्र मिळणार
शाळा, कॉलेज यासाठी महसूल विभागाकडून मिळणाऱ्या आवश्यक प्रमाणापत्रासाठी आता स्टॉप पेपर तयार करून देण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानंतर 48 तासाच्या आत संबंधित प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. अशा प्रकाराच्या सुचना महसूल विभागाला दिल्या आहेत असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रमोशनबाबत लवकरच निर्णय होतील. महसूल विभागाबाबत आलेल्या बातमीचीही दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी असेही आपण अधिकाऱ्यांना सांगितले आहे.