धाराशिव (प्रतिनिधी)- राहत अर्बन क्रेडिट को-ऑप पतसंस्था लि. धाराशिवची 17 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच धाराशिव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत पतसंस्थेच्या गेल्या वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी वर्षासाठी महत्त्वाचे ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले.
या पतसंस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ती “ना नफा ना तोटा“ या तत्वावर चालते. कुरआनमधील पवित्र पंगतीनुसार “अल्लाह व्याजाचा नाश करतो व दान-धर्मांची वाढ करतो” या तत्वज्ञानाला अनुसरून पतसंस्थेची आर्थिक रचना उभी करण्यात आली आहे. त्यामुळेच सभासदांच्या गरजेनुसार मदतीचा हात पुढे करण्यास ही संस्था सदैव तत्पर असते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण चेअरमन सजीयोद्दीन शेख यांनी केले. वार्षिक अहवालाचे वाचन सेक्रेटरी सिकंदर पटेल यांनी सादर केले. यावेळी मधुकर जाधव साहेब यांनी सहकार कायदे आणि नविन उपविधी याबद्दल सखोल मार्गदर्शन करून सभासदांना उपयुक्त माहिती दिली.
सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली व सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन रियाज शेख यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर कदम, गवारे, अहमद मौलाना यांच्यासह संस्थेचे संचालक, कर्मचारीवर्ग आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.