धाराशिव (प्रतिनिधी)-  मान्सूनच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले आहे. शहरात सोमवारपासून कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शहरात सर्वत्र चिखल व खड्ड्याचे रस्ते बनले आहेत. गेल्या चार दिवसपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे धाराशिव शहरातील रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेले होते. नाल्या तुंबल्याने अंतर्गत रस्त्यांना डबक्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना कसरत करावी लागली. 

शुक्रवारी दिवसभर हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्याने शहरातील रस्ते तसेच सखल भागात पाणी साचलेले होते. अनेक भागात नाल्यांची सफाई केली नसल्याने प्लॉस्टिक नाल्यांमध्ये अडकून राहिल्याने पाणी तुंबले. पाणी रस्त्यावर वाहू लागले होते. नाल्यांतील घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिक दुर्गंधीने हैराण झाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा फुले चौक, न्यायालय परिसर ते समर्थ नगरकडे जाणारा रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. बौध्द नगर, ख्वॉजा नगर, गालीब नगर परिसरातील रिकामे प्लॉट तसेच रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौकादरम्यानच्या रोडवर नाल्याचे पाणी आल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. परिसरात शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पाण्यातूनच वाट काढत जावे लागले. मुलांना सोडण्यास आलेल्या पालकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. पालिकेने पावसाळी पूर्व केलेल्या कामाचे मोठ्या पावसाने पितळ उघडे पडल्याने नागरिकांमधून पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. 

 
Top