तुळजापूर (प्रतिनिधी)- टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर कॅम्पस येथे दिनांक 28 जुलै 2025 रोजी एम.ए. समाजकार्य इन रूरल डेव्हलपमेंट (2025-2027) या नव्या बॅचच्या अभ्यासक्रमाचे औपचारिक उद्घाटन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रम कॅम्पसच्या जिमखाना इमारतीतील सभागृहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बाळ राक्षसे, कॅम्पस संचालक,  तुळजापूर होते, तर मुख्य अतिथी म्हणून डॉ. गणेश अग्निहोत्री, प्राचार्य, जालना एज्युकेशन सोसायटी, जालना हे उपस्थित होते. तसेच प्रा. रमेश जारे (माजी कॅम्पस संचालक), डॉ. मनोज जोशेफ (प्रोग्राम समन्वयक), डॉ. संपत काळे, डॉ. गजानन हिवाळे (विद्यार्थी व्यवहार प्रमुख), श्री. देविदास कदम (प्रशासन अधिकारी) आणि इतर मान्यवर प्राध्यापक व कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रकाशाचा हा मंगल प्रारंभ ज्ञान, समर्पण आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यानंतर स्वागतपर भाषण आणि सूत्रसंचालन डॉ. गजानन हिवाळे (विद्यार्थी व्यवहार प्रमुख) यांनी केले. त्यांनी नव्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या परंपरेप्रमाणे मन:पूर्वक स्वागत केले.

उद्घाटनपर भाषण : प्रा. बाळ राक्षसे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि  तुळजापूरचे कॅम्पस संचालक प्रा. बाळ राक्षसे यांनी “शिक्षणातून सामाजिक परिवर्तन” या संस्थेच्या मूलमंत्रावर आधारित आपले मोलाचे विचार मांडले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “- अभ्यासक्रम ग्रामीण भागासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांची, संवेदनशीलतेची आणि समावेशाच्या दृष्टिकोनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतो. या अभ्यासक्रमातून तयार होणारे विद्यार्थी केवळ नोकरीसाठी नव्हे, तर समाजातील असमानता, गरिबी, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत परिवर्तन घडवण्याचे कार्य करतात.” ते पुढे म्हणाले, “तुम्ही येथे केवळ पदवी मिळवण्यासाठी आलेले नाही, तर एक जबाबदार आणि संवेदनशील नागरिक म्हणून स्वतःला घडवण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी येथे आहात याची जाणीव करून दिली.  

प्रमुख मार्गदर्शन : डॉ. गणेश अग्निहोत्री कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. गणेश अग्निहोत्री, प्राचार्य, जालना एज्युकेशन सोसायटी, यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक हस्तक्षेप, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाची गरज या विषयांवर अत्यंत समृद्ध विचार मांडले.

ते म्हणाले, “ग्रामीण समाज समजून घेण्यासाठी ‌‘संवेदनशीलता', ‌‘सहभाग' आणि ‌‘कृती' ही त्रिसूत्री अत्यावश्यक आहे. शिक्षण आता केवळ ज्ञान प्रदान करणारे माध्यम राहिले नसून, सामाजिक भान जपणाऱ्या नेतृत्वाची पिढी घडवणारे प्रभावी साधन ठरले आहे. विद्यार्थ्यांनी समाजाच्या समस्यांशी प्रत्यक्ष जोडून, लोकांसोबत राहून, कृतीशील सहभागातून परिवर्तनाची दिशा ठरवली पाहिजे. खरे शिक्षण फक्त पुस्तकात नसते; ते प्रत्यक्ष समाजात, लोकांच्या जीवनात असते.” याप्रसंगी त्यांनी  च्या ‌‘उन्नत भारत अभियान' उपक्रमाचेही कौतुक केले.

शैक्षणिक व क्षेत्रीय माहिती सादरीकरण

यानंतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची ओळख करून देण्यात आली. संस्थेच्या कार्यपद्धतीवर आधारित माहितीपट सादर करण्यात आला. - अभ्यासक्रमाची रचना व अभ्यासक्रमविषयक तपशील डॉ. मनोज जोशेफ (प्रोग्राम समन्वयक) यांनी प्रभावीपणे मांडले.

श्री. गणेश चादरे व श्री. शंकर ठाकरे यांनी    ची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांसमोर सादर केली. ग्रामदर्शन, शाश्वत शेतीविषयक उपक्रम, जलसंवर्धन, आणि विद्यार्थी नेतृत्व विकास या उपक्रमांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “ तुळजापूर ही संस्था केवळ शैक्षणिक केंद्र नसून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुषंगाने प्रत्यक्ष कृतीशील शिक्षणावर भर देणारी सामाजिक प्रयोगशाळा आहे.”

त्यानंतर डॉ. विरेश हांचीनाल यांनी ग्रंथालय सेवा, तर श्री. सतीश तांबे यांनी संगणक केंद्राच्या सुविधा याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय व संगणक केंद्राचा प्रत्यक्ष दौरा करून देण्यात आला.

हा उद्घाटन सोहळा विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या उत्साही सहभागामुळे संस्मरणीय ठरला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच विद्यार्थ्यांमध्ये समाजकार्याची मूल्ये, परिवर्तनाची भावना आणि प्रत्यक्ष कृतीची दिशा ठसवण्यात आली.


 
Top