तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सांगवी काटी येथील गट नंबर 720 मधून जाणारा आणि शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी अत्यावश्यक असलेला रहदारीचा शेत रस्ता शेतकऱ्यांनी अडवल्याने परिसरातील इतर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर पत्रे, लाकडे, टायर जाळून अडथळा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे आणि शेती कसणे कठीण झाले आहे.
सदर रस्ता हा अनेक वर्षांपासून वापरातील (वहिवाटीचा) असून, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवल्याने इतर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाकडे तात्काळ अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली आहे.