तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरात नागपंचमी निमित्त महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात स्त्रीशक्तीचा अफाट उत्सव पाहायला मिळाला. भाजप युवा नेते विनोद गंगणे यांच्या वतीने हाडको मैदानावर आयोजित तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमात विविध जातीधर्मातील हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मंगळवारी सायंकाळी लहानग्या चिमुकल्यांपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्व स्तरांतील महिलांनी गर्दी करत मैदान फुलवले. या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, याच कार्यक्रमात अर्चनाताईंचा वाढदिवसही साजरा करण्यात आला आणि तोही हजारोंच्या उपस्थितीत!
“राणादादा म्हणजे विकासच !“ अर्चनाताईंचा विश्वास
यावेळी बोलताना अर्चनाताई गंगणे म्हणाल्या,“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा निधी तिर्थक्षेत्र विकासासाठी दिला आहे. पुढील पाच वर्षांत तुळजापूरची ओळखही बदललेली दिसेल!“
तसेच त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करणारे विनोद गंगणे आणि त्यांच्या टीमचे विशेष आभार मानले. प्रारंभी त्यांचा सत्कार अर्चनाताई, विनोद गंगणे आणि प्रियंका विजय गंगणे यांच्या हस्ते करण्यात आला.
तीन दिवसांचा महिला उत्सव, पारंपरिक खेळ, नृत्य आणि बक्षिसांचा वर्षाव
कार्यक्रमात महिलांसाठी झोके, फुगडी, फेर धरने, सिंगिंग आणि डान्सिंग अशा पारंपरिक व आधुनिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सहभागी महिलांसाठी सोफासेट, पोळी डबे, पाण्याचे कॅन, संसारोपयोगी वस्तूंचे बक्षीस ठेवण्यात आले.
पाटील कुटुंबाच्या नव्या सुनेस देवीची साडी भेट!
या कार्यक्रमात एक भावनिक क्षण घडला. विनोद गंगणे यांच्या वतीने पाटील कुटुंबातील नव्या सुनबाईस श्रीतुळजाभवानी मातेस अर्पण केलेली साडी भेट देण्यात आली. यावेळी अर्चनाताईंनी भावना व्यक्त करत म्हणाल्या,“साडी रूपाने मिळालेला आशीर्वाद हे आमच्यासाठी मोठं भाग्य आहे.“
दहा वर्षांचा विश्वास,महिलांचा प्रचंड प्रतिसाद
या उपक्रमाचे हे दहावे वर्ष असून, प्रत्येक वर्षी महिलांचा वाढता प्रतिसाद हेच गंगणे यांच्या सामाजिक जाणीवेचे द्योतक ठरले आहे. संध्याकाळच्या वेळी माहेरी आलेल्या महिलांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक खास आनंदाचा अनुभव ठरत आहे. या कार्यक्रम यशस्वीते साठी विनोद गंगणे, विजय गंगणे व भाजप नगरसेवक व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी झपाटून परिश्रम घेतले.