मुरुम (प्रतिनीधी)- येथील महात्मा बसवेश्वर व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळ निवडणुकीनंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाने शनिवारी दि. 5 जुलै रोजी सर्वानुमते शिवशरण वरनाळे यांची चेअरमनपदी तर शरणप्पा मुदकन्ना यांची व्हाइस चेअरमन पदी बिनविरोध निवड केली. ही निवड जागतिक सहकार दिनाच्या निमित्ताने पतसंस्थेच्या बसव सहकार भवनच्या सभागृहात पार पडली. यावेळी पतसंस्थेच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ज्ञानराज चौगुले होते. यावेळी भीमराव वरनाळे, पॅनल प्रमुख चंद्रशेखर मुदकन्ना, भारत शिक्षण संस्थेचे संचालक तानाजी फुगटे, व्यापारी पतसंस्थेचे नूतन संचालक बाबासाहेब बिराजदार, शिवसेना तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे, तालुका उपप्रमुख व्यंकटराव पाटील, आप्पासाहेब पाटील, माजी प्राचार्य दत्ता इंगळे, बलभीम येवते आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन शिवशरण वरनाळे व व्हाइस चेअरमन शरणप्पा मुदकन्ना यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बोलताना चौगुले यांनी पतसंस्थेच्या सामाजिक व आर्थिक योगदानाचे कौतुक केले आणि संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी नवीन नेतृत्वाकडून पारदर्शक कारभार व सभासदांच्या हितासाठी कार्य करण्याचा संदेश दिला. त्यांनी सहकार चळवळीवर प्रकाश टाकून पतसंस्थेला आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकत्र राहण्याचे आव्हान केले. यावेळी शिवशरण वरनाळे, चंद्रशेखर मुदकन्ना यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दत्ता इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार मनीष मुदकन्ना यांनी मानले. या कार्यक्रमाला पतसंस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top