उमरगा (प्रतिनिधी)-  गेल्या अनेक वर्षापासून उमरगाकरांचे असणारे बसस्थानकाचे स्वप्न प्रत्यक्षात येत असून, उमरगा बस स्थानकाच्या बांधकामासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

उमरगा शहरातील बहुप्रतिक्षित बसस्थानकाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार प्रवीण स्वामी,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,माजी खासदार रविंद्र गायकवाड,सुरेश बिराजदार,छत्रपती संभाजीनगर विभागाच्या उपमहाव्यवस्थापक अनघा वारटक्के, राज्य परिवहन मंडळाचे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव, विभागाचे अधिकारी व विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सरनाईक म्हणाले, उमरग्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी दर्जेदार बसस्थानकाची गरज होती. ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.आता या प्रकल्पाला सुरुवात झाल्याने शहराच्या विकासाला चालना मिळणार असून,प्रवाशांच्या सुविधांमध्ये मोठी भर पडेल.नवीन बस स्थानकाचे बांधकामास सुमारे 5 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.यापैकी 3 कोटी 39 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून, या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक तिकिट घर,विश्रांतीगृह, स्वच्छतागृह,महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.यामुळे उमरगा व परिसरातील हजारो प्रवाशांना प्रवासासाठी सुसज्ज व सुरक्षित स्थान उपलब्ध होणार आहे.कार्यक्रमास राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी-कर्मचारी स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top