धाराशिव (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशिय सामाजिक संस्था यांच्या वतीने दि.13/07/2025 रविवार रोजी सकाळी 11:00 वा. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळकरोड, अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रा. सोमनाथ लांडगे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रा. सोमनाथ लांडगे यांना या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र संस्थेचे अध्यक्ष श्री का. म. जाडकर यांनी पाठवलेले आहे. आपल्या पत्रात प्रा. सोमनाथ लांडगे यांना उद्देशून आपण गेली कित्येक वर्ष समाज निर्मितीसाठी घट्ट पावले रोवून एक चांगले पुण्य काम करीत आहात. तसेच संविधानातील मुल्यांची जोपासणा जनमानसात आपल्या विविध शैक्षणिक उपक्रम व कार्याद्वारे यशस्वी करीत आहात. प्राप्त परिस्थितीचे योग्य आकलन करून तात्कालीन समस्यांना भिडून आपल्या परिने या प्रक्रियेला जास्तीत जास्त गतीमान करून आपले विचार पुढे नेणारे असतात. तसेच अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मदत करून यशस्वी करत आहात. असा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच तुमच्या या कार्याला सलाम करण्यासाठी आम्ही जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशिय सामाजिक संस्था व यशवंत सेना, अहिल्यानगर यांच्यावतीने आपण सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असल्याबद्दल आपणास राज्यस्तरीय आदर्श शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करत आहोत असे म्हटले असून सदर पुरस्कार  विविध मान्यवरांच्या हस्ते अहिल्यानगर येथे आपल्याला बहाल करण्यात येत आहे, असे नमूद केलेले आहे.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय पोलीस अधीक्षक धनंजय सोलंकर प्रमुख पाहुणे म्हणून माधव भाऊ गडदे सरसेनापती यशवंत सेना, श्री प्रविण कोरगंटीवार सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग, डॉ. उमेश पाटील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, श्री देविदास कोकाटे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, श्री आनंद कोकरे पीएसआय, डॉ. राहुल पंडित, डॉ. अमोल जाडकर, डॉ. योगेश जेठे, डॉ. अनिल धनगर, मच्छिंद्र बिडकर, मनोज कोतकर, सोनू घेंबुड, विजय तमनर, मच्छिंद्र गवते, राहुल कोळेकर, रामनाथ जऱ्हाड, राजेंद्र तागड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रा. सोमनाथ लांडगे यांना या वर्षात अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. या वर्षातील राज्यपातळीवरील तिसरा पुरस्कार आहे. प्रा. सोमनाथ लांडगे यांनी आपल्या श्री साई श्रद्धा एज्युकेशनच्या सहाय्याने महाराष्ट्रातील जवळपास 16 जिल्ह्यातून आतापर्यंत 288 मुला-मुलींना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिलेला आहे. धाराशिव शहरात अत्यंत अल्प फीस घेऊन ते मुलीचे वसतीगृह ही चालवत आहेत. सध्या ते धाराशिव शहरातील बिल गेट्स ज्युनिअर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या एकूण सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

 
Top