तुळजापूर (प्रतिनिधी)- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि सहकार चळवळीतील अत्यंत अनुभवी व्यक्तिमत्त्व मधुकरराव चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी समितीवर निवड झाली आहे. ही निवड अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी अधिकृत पत्राद्वारे जाहीर केली.
1957 मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्ते म्हणून सुरुवात करत, त्यांनी पंचायत समितीच्या सभापतीपासून ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदापर्यंत यशस्वी वाटचाल केली. 1982 जिल्हा बँकेचे यशस्वी नेतृत्व मराठवाड्यात क्रमांक 1 ची बँक, 1983 श्री तुळजाभवानी साखर कारखान्याची उभारणी, 1990 तुळजापूर विधानसभेतून काँग्रेसचे आमदार, 1999: मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा), 2009: विधानसभेचे उपाध्यक्ष 2010-2014: पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय व परिवहन मंत्री जनतेसाठी कार्य काँग्रेससाठी निष्ठा या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी गाव तिथे सभागृह, साठवण तलाव, शेती रस्ते, पाझर तलाव, वनसंवर्धन, रोहयोच्या माध्यमातून रोजगार, सहकार विकास, अशा असंख्य योजना यशस्वीपणे राबवल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने धाराशिव जिल्ह्यात भक्कम पाय रोवले आहेत. आता कार्यकारी समितीवर झालेल्या त्यांच्या निवडीमुळे, जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मधुकरराव चव्हाण यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे ते निवडणुकीत सक्रीय झाले नव्हते.