वाशी (प्रतिनिधी)- आषाढी एकादशी निमित्त वाशी येथे 'प्रति पंढरपूर' उभा राहत भक्तीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.दिंडी, कीर्तन,अभिषेक आणि भजनांनी तालुक्यातील वातावरण भक्तिरसात नाहून निघालं होतं. विशेष आकर्षण ठरली ती 'माऊली कलायोगी आर्ट 'तरुण मंडळांनी साकारलेली सामाजिक संदेश देणारी रांगोळी.ज्यामध्ये “हुंडा बंद झाला पाहिजे - हीच खरी वारी!“ असा प्रभावी संदेश रेखाटण्यात आला होता. विठ्ठल-रुक्मिणीच्या पायाशी हुंडाबळी दिलेल्या कन्येचं आणि लक्ष्मी चित्र दाखवत, समाजाला विचार करायला लावणारी रांगोळी पाहण्यासाठी शेकडो भाविक जमले.या उपक्रमाचं उद्दिष्ट केवळ धार्मिकतेपुरतं मर्यादित न ठेवता समाजजागृतीही करणं होतं.तालुक्यातील तरुणींनी व काही तरुण युवकांनी एकत्र येऊन रांगोळी तयार केली यामध्ये
त्यांनी हुंडा प्रथा किती अपप्रवृत्त आहे. यावर लोकांशी संवाद साधला. स्वयंसेवकांची शिस्त व अन्नदान सेवा भाविकांच्या नजरेत भरली.सेवेत गावातील युवकांनी स्वयंसेवक म्हणून काम करत दिंडी मार्गावर शिस्तबद्ध व्यवस्था, पाणीपुरवठा,स्वच्छता,आणि भाविकांची मदत अशा सेवा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दिल्या. भाविकांसाठी खास करून फराळ व अन्नदान उपक्रम आयोजित करण्यात आला होता.गरजू भाविकांना उपवासासाठी शुद्ध व सात्विक फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक कीर्तनकारांनी कीर्तनातही या विषयावर अभंग रचले होते .“हुंडा घेणारा नरकाला जाई, पावन होई तो जो नाकाराई“, असा संदेश देत संतपरंपरेतील सामाजिक जागृती जिवंत ठेवली. या उपक्रमामुळे 'प्रति पंढरपूर' तपोवन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा आषाढी एकादशी उत्सव अधिक अर्थपूर्ण ठरला,असा भाविकांचा अभिप्राय होता.