धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील एकमेव तुळजाभवानी स्टेडियममध्ये विविध खासगी अकॅडमींच्या वर्गांनी व्यायामाच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर जागा व्यापल्याने सर्वसामान्य नागरिकांना सकाळ-संध्याकाळच्या वेळेत कसरत करणे अवघड झाले आहे.
विशेषतः धावपटू, जेष्ठ नागरिक आणि महिला व्यायामासाठी स्टेडियममध्ये येत असतात. मात्र अकॅडमीचे खेळाडू आणि प्रशिक्षण वर्गांच्या गर्दीमुळे स्टेडियममध्ये मोकळ्या जागेचा अभाव भासत असून अनेकांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे.
स्थानिक नागरिकांनी याविरोधात नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. “हे स्टेडियम केवळ खासगी अकॅडमीसाठी नव्हे, तर सर्वांसाठी आहे. सार्वजनिक सुविधा सर्व नागरिकांसाठी खुल्या असाव्यात,” अशी मागणी होत आहे. स्थानिक प्रशासन आणि क्रीडा विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वतंत्र वेळ किंवा जागा राखून द्यावी, अशी मागणी स्टेडियम वापरणाऱ्या नागरिकांतून होत आहे.