धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील नूतन प्राथमिक विद्यामंदिरासमोर काल झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा नाले तुंबले. नाल्यांचे सांडपाणी थेट शाळेच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर आल्याने विद्यार्थ्यांचे व पालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहानग्या विद्यार्थ्यांना डबक्यातून वाट काढत शाळेत जावे लागले. ही परिस्थिती बघून एकच प्रश्न उपस्थित होतो, धाराशिव शहराला प्रशासन नावाचा वाली आहे की नाही?

नगरपरिषदेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे सर्व फक्त उद्घाटनं, फीत कापणे आणि फोटोसेशनपुरते मर्यादित आहेत का? शाळेच्या दारातच नाल्याचे पाणी साचते आणि यांच्याकडून साधी नालेसफाईही वेळेवर होत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे.


विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

या सांडपाण्यात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका स्पष्टपणे दिसून येतो. तरीसुद्धा पालिकेने कोणतीही तात्काळ कारवाई केली नाही हे अत्यंत गंभीर आहे. या दुर्लक्षामुळे उद्या एखाद्या विद्यार्थ्याला काही त्रास झाला तर त्याला जबाबदार कोण?


किती दिवस असं सहन करायचं?

पालकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की “प्रशासन झोपलंय. नाला तुंबल्याची तक्रार वारंवार करूनही कोणी ऐकत नाही. शाळेच्या दारात पाणी साचून मुले बेजार झालीत. उद्या आमची मुलं आजारी पडली तर जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.


 
Top