धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील 82 ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त घोषित करत कांस्य पदक प्रदान करण्यात आले. यानिमित्ताने आज जिल्हा परिषदेमार्फत ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा' जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मारुती कोरे,सहसंचालक,कुष्ठरोग, धाराशिव होते.डॉ.अभिजीत बनसोडे (जिल्हा क्षयरोग अधिकारी), संतोष नलावडे (गटविकास अधिकारी), डॉ.प्रमोद गिरी (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ.रमजान अली शेख (जिल्हा क्षयरोग केंद्र) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष आणि डॉ.सतीश हरिदास (जिल्हा आरोग्य अधिकारी) यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात रॉबर्ट कॉक व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली.त्यानंतर क्षयरोग जनजागृती प्रतिज्ञा घेण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2023 रोजी वाराणसी येथील जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमात ‘टीबी मुक्त भारत' अभियानाची घोषणा केली होती. त्यानुसार,1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत “क्षयरोगमुक्त गाव,माझी जबाबदारी” या संकल्पनेअंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये संशयित क्षयरुग्णांचा शोध,जनजागृती,थुंकी नमुन्यांची तपासणी आदी उपक्रम राबविण्यात आले.गटविकास अधिकारी संतोष नलावडे यांनी क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यासाठी वैयक्तिक लक्ष देण्याची ग्वाही दिली.
डॉ.अभिजीत बनसोडे यांनी सर्व सरपंचांना “निक्षय मित्र” होण्याचे आवाहन केले.डॉ.प्रमोद गिरी यांनी फूड बास्केटच्या महत्त्वावर प्रकाश टाकून पुढील वर्षी तालुक्यातील 100 टक्के ग्रामपंचायती पात्र ठरतील,असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या द्वासे यांनी केले व आभार डॉ.प्रमोद गिरी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तानाजी क्षीरसागर, दीपक व्हटकर,सचिन तटाळे,अमोल साळुंखे,संजय माने,अमित गाडे, राजेंद्र पवार,दीपक जाधव,चैताली पवार,स्नेहा पेठे आदींनी मेहनत घेतली.