कळंब (प्रतिनिधी)- दशमी व्रताचा आरंभु, दिंडी कीर्तन करा समारंभु... तेणे तो स्वयंभु, संतोष पावे... एकादशी जागरण, हरिपूजन नामकीर्तन... द्वादशी क्षीरापती जाण, वैष्णव जन सेविती... याप्रमाणे पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे असा आषाढी वारीचा सोहळा साकारूनी घराची वाट धरलेल्या तब्बल पन्नास हजारच्या आसपास वारकऱ्यांनी कळंब येथील स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीने आयोजीत केलेल्या अन्नछत्रात द्वादशी सोडली.
पंढरपूरचा पांडूरंग महाराष्ट्रातील लाखो कष्टकऱ्यांचे, वारकऱ्यांचे आराध्य दैवत. या दैवताचे आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन घेत 'वारी' करणे ही पण एक तयांची मुख्य उपासना. दशमी तिथीला पंढरीत दाखल होत चंद्रभागेच्या खळाळत्या पाण्याचा कायेला स्पर्श झाला की रात्रीचा जागरात संकीर्तन श्रवण व हरीनामाचा गजर करणे, तेथून बा विठ्ठलाचे दर्शन घेणे हा वारीचा अन् वारकऱ्यांचा शिरस्ता. परत द्वादशीला हे समस्त वैष्णवजन परतीचा मार्ग धरतात. शेगाव पंढरपूर व्हावा कळंब या मांजरा ते तेरणा नदीला स्पर्शून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून द्वादशी दिवशी लाखो भाविक आपापल्या गावाकडे परतात. यादिवशी संपुर्ण महामार्ग वाहनांच्या वर्दळीने गच्च असतो. शिवाय शेकडो किमीचा पल्ला गाठायचा असतो. यास्थितीत त्यांच्या भोजनाची गैरसोय होते. यामुळेच मागच्या दशकभरापासून कळंब येथील स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडी व शहरवासियाच्या सहयोगातून अन्नछत्र चालवते. सोमवारी सकाळी आठ वाजता याठिकाणी सेवेचा प्रारंभ झाला. रात्री उशीरापर्यंत तो अविरत सुरू होता. यात गरमागरम गव्हाची पुरी, बटाट्याची रस्सा भाजी, मसाला भात, हिरव्या मिरचीचा ठेचा, जिलेबी, केळी असा मेन्यू होता.
कळंब बसस्थानकाच्या आवारात सुरू केलेल्या अन्नछत्रात सकाळपासूनच वारकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा होत्या. हजारो वाहने व अनगणित वारकऱ्यांची या अन्नछत्राला पाय लागले. त्यांच्या सेवेसाठी सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार, तरूण, विद्यार्थी, संत निरंकारी मंडळ असे शहरवासियाच्या स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या हातात हात घालून राबले.
भोजनासाठी एवढे लागले सामान
600 किलो गव्हाच्या पुऱ्या : 800 किलो तांदळाचा मसाला भात... अन्नपूर्णा केटरिंगच्या शिवाजी शिरसाठ यांनी भोजन कक्षाची धुरा सांभाळली. याठिकाणी 375 किलो तेलामध्ये 800 किलो गव्हाच्या पुऱ्या व 1000 किलो तांदळाचा मसाला भात बनवण्यात आला. रस्सा भाजीसाठी 500 किलो बटाटे व 100 किलो कांदा, तितकेच टॉमेटो वापरण्यात आले. 100 किलो हिरव्या मिरचीचा ठेचाही होता. शिवाय सुरेश आडणे यांनी दिवसभर 500 किलो जिलेबी पुरवली. एका भक्तांनी केळी पुरवली. हा सेवाभाव दखलपात्र असाच... आघाडीचे बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा, यश सुराणा,हरीभाऊ कुंभार, संजय घुले, बाळासाहेब जाधवर, गणेश करंजकर,पंकज कोटेचा,निलेश होनराव, नितीन काळे,ज्योती सपाटे, गजानन फाटक, अशोक फल्ले, गोविंद खंडेलवाल अमर चाऊस, श्याम जाधवर, लहुराज अष्टेकर, भाऊसाहेब शिंदे, दत्ता तनपुरे, निर्भय घुले, उदय खंडागळे, गजानन फाटक, डॉ गोविंद जोगदंड, बाबू चाऊस,बाबुराव शेंडगे, संदीप शेंडगे,मयुर विडेकर, दिपक साखरे, वैभव कुपकर, वैभव कोळपे, नवनाथ पुरी, मनोज फल्ले, प्रकाश खामकर, रोहित किरवे, राहुल किरवे, धर्मराज पुरी, संतोष काळे, विश्वजित पुरी आदी शेकडोंनी परिश्रम घेतले.