उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरातील पतंगे रोडवरील मोमीन मशीद परिसरात राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी एका आरोपीला उमरगा पोलिसांनी अवघ्या 24 तासात पुण्यातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. उमरगा पोलिसांनी एका गुन्ह्याचा छडा लावून ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
सौमाया रमेश शिंदे (वय 45) ही महिला आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर गळा आवळल्याचे व्रण दिसल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून तपासाचा फास तिच्या प्रियकरावर आवळला गेला. माधव पांडुरंग पाचंगे (वय 44, रा. हिप्परगाव, सध्या म. तुरोरी, ता. उमरगा) याच्यावर सौमाया हिच्या चारित्र्यावर संशय होता. याच रागातून त्याने तिच्या राहत्या घरी जाऊन गळा दाबून तिचा खून केल्याचे उघड झाले.
फिर्यादी रोहिणी दिपक पाटोळे (साईनगर सोसायटी, मांजरी, पुणे) यांनी उमरगा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भा.न्या.सं. कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अवघ्या 24 तासात पुण्यातून आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे माग काढून त्याला अटक करण्यात आली. 15 जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी 18 जुलैपर्यंत मंजूर झाली आहे.
पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पो.उ.नि. गजानन पुजरवाड, चैतन्य कोनगुलवार, अतुल जाधव, वाल्मिक कोळी, शिवलिंग घोळसगाव, अनुरुद्र कवळे यांच्या पथकाने केली.