राजा वैद्य
धाराशिव- 16 एप्रिल रोजी धाराशिव जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक भावी सरपंच कामाला लागले होते. परंतु 13 जून रोजी राज्य शासनाने एक अधिसुचना प्रसिध्द केली आहे. या अधिसुचनेमध्ये सरपंच पदाच्या आरक्षणात बदल होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे 16 एप्रिल रोजी 621 गावाचे सरपंच पदाचे काढलेले आरक्षण रद्द झाले आहे.
राज्यातील सरपंचाचे आरक्षण 5 मार्च 2025 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला इत्यादींसाठी राज्यातील एकूण ग्रामपंचायतीपैकी किती ग्रामपंचायती राखीव राहतील हे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार 16 एप्रिल रोजी धाराशिव जिल्ह्यात देखील तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण फिरत्या क्रमांने व ड्रा पध्दतीने काढण्यात आले होते. परंतु राज्याच्या ग्रामविकास विभागाने 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला त्याप्रमाणे 13 जून 2025 रोजी नवीन अधिसुचना जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग इत्यादीसाठी सरपंच पदाच्या राखीव जागेमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे शासनाने काढलेले अधिसुचना आणि दिलेले आदेश यामुळे सरपंच पदाचे आरक्षण नव्याने निश्चित करण्याबाबत मोठ्या संभ्रम निर्माण झाल्ा आहे. 13 जून 2025 च्या अधिसुचनेचा आधार घेवून ग्रामविकास विभागाने 16 जून रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सरपंच पदाचे आरक्षझ निश्चित करण्याबाबत लेखी निर्देश दिले आहेत. 15 जुलै पर्यत त्याचा अहवाल सादर करण्याचा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे.
16 एप्रिलचे आरक्षण
16 एप्रिल रोजी 621 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण जागा 100 त्यामध्ये महिलांसाठी 50 जागा, अनुसूचित जमातीसाठी 13 जागा त्यामध्ये 7 जागा महिलांसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्ग 166 जागा, त्यामध्ये महिलांसाठी 83 जागा आणि खुला प्रवर्गासाठी 342 जागा यामध्ये 171 महिलांसाठी जागा या प्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण आठही तालुक्याचे काढण्यात आले होते. मात्र नव्याने धाराशिव, उमरगा, तुळजापूर, परंडा, कळंब या पाच तालुक्यात खुला प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये 2 जागेचा आरक्षणाबाबत बदल होणार असल्याचे शासकीय सुत्रांनी सांगितले. लोहारा, वाशी, भूम या तालुक्यात सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत कोणताही बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले.
दोन जागेचा होणार परिणाम
राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने सरपंच पदाच्या नव्याने आरक्षण काढण्याबाबत दिलेल्या आदेशामुळे धाराशिव जिल्ह्यात दोन जागेचा परिणाम होणार असल्याचे शासकीय सुत्राने सांगितले. धाराशिव जिल्ह्यात एकूण 621 ग्रामपपंचायत आहेत. पहिल्या टप्प्यात 428 ग्रामपंचायतच्या निवडणूक होणार आहेम. तर 2027 साली 167 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहेत. उर्वरित ग्रामपंचायतच्या निवडणुका कार्यकाळ संपल्यानंतर होणार आहेत. 16 एपिल रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये खुला प्रवर्गासाठी 342 सरपंच पदासाठी आरक्षण निघाले होते. ओबीसीसाठी 166 सरपंच पदासाठी आरक्षण निघाले आहे. नव्याने काढण्यात येणार आरक्षणामध्ये खुला प्रवर्गाच्या 2 जागा कमी होवून ओबीसी प्रवर्गाच्या 2 जागा वाढतील असे सांगितले जात आहे.
राज्य सरकारचे स्पष्ट आदेश येतील
येत्या 15 जुलैपर्यंत सरपंच आरक्षणाबाबतच अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे या आठवड्यात आरक्षणाबाबत राज्य सरकारचे स्पष्ट आदेश येतील.
स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन धाराशिव