भूम (प्रतिनिधी)- राज्य शासनाने शालेय शिक्षण धोरणामध्ये इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा सक्तीची केल्याच्या विरोधात तसेच भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भूम शहरात महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय महसूल कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजी करत उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात महाविकास आघाडीने स्पष्ट केले की, “मराठी ही राज्याची मातृभाषा असून, तिच्या अस्तित्वाला धोका पोहोचवणारी कोणतीही सक्ती आम्हाला मान्य नाही. हिंदी सक्तीमुळे मराठी विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासावर विपरित परिणाम होईल.“
तसेच भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी भरसभेत शेतकऱ्यांबाबत केलेले अपमानास्पद वक्तव्य हे लोकशाही व्यवस्थेचे अपमान करणारे आहे, असा आरोप करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली. “शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या आमदाराचा आम्ही जोडा मारत निषेध करतो,“ असे आंदोलनकर्त्यांनी ठणकावून सांगितले.
या यावेळी निवेदन सादर करताना उभटागटाचे भूम तालुका प्रमुख अनिल शेंडगे, महिला संघटक उमाताई रणदिवे, मीनाताई कोकणे, काँग्रेस नेते रुपेश आप्पा शेंडगे, विलास शाळू, उबाठा गटाचे समन्वयक दिलीप शाळू महाराज, राष्ट्रवादी शरद पवार गट विनोद नाईकवाडी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.